निवडणुकीत चुलतभावाविरोधात पत्नीला केलं उभं, पण प्रचारावेळी पतीचा मृत्यू..

निवडणुकीत चुलतभावाविरोधात पत्नीला केलं उभं, पण प्रचारावेळी पतीचा मृत्यू..

------------------------------------------------------------------------------------

लातूर;( दै.पंढरी नगरी न्यूज) : राज्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी प्रचाराचा धडाका उमेदवारांनी लावला आहे. दरम्यान, एका गावात पत्नीचा प्रचार करत असताना पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.गावात चुलत भावाच्या पॅनेलची सत्ता होती. ती उलथवून टाकण्यासाठी सरपंचपदासाठी पत्नीलाच उभा केलं होतं. त्यामुळे पत्नीच्या प्रचारासाठी पती दिवसरात्र मेहनत घेत होता. पण निवडणुकीच्या आधीच प्रचारावेळी त्यांना मृत्यूने गाठलं.

लातुर जिल्ह्यातील मुरूड गावात ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमर पुंडलिक नाडे यांनी सरपंचपदासाठी पत्नीला ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. गेल्या तीन दशकांपासून त्यांच्या चुलत भावाची ग्रामपंचायतीत सत्ता आहे. तरी गावचा विकास न झाल्यानं भावाविरोधात त्यांनी शड्डू ठोकला होता.

प्रचारावेळी त्यांनी पत्नी सरपंचपदी निवडून यावी, तिला तुम्ही मतं द्यावीत असा म्हणून ते खाली बसले होते. त्यानंतर काहीच वेळेत त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मुरुड गावच्या ग्रामपंचायतीत अमर नाडे यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुरुडमधील चौकात १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सभा आयोजित केली होती.

त्या सभेत पत्नीच्या प्रचारानिमित्त त्यांनी भाषण केलं होतं. भाषणानंतर ते खाली बसले तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागले. याबाबत त्यांनी पत्नीला सांगितलं त्यानंतर काहीच क्षणात ते खुर्चीवरून खाली पडले. अमर नाडे यांना तिथून रुग्णालयात नेण्यात आले.

पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अमर नाडे हे लातूरमध्ये भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्यरत होते. याशिवाय ते मुरुडच्या अष्टविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. अमर यांनी बीई प्रोडक्शन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या गावात चुलत भाऊ दिलीप नाडे यांच्याकडे गेल्या तीन दशकांपासून ग्रामपंचायतीची सत्ता आहे. अमर नाडे यांना भावाविरोधातच पॅनेल उभा करून प्रचाराला सुरुवात केली होती.