विद्यार्थ्यांनो आत्मविश्वास जागृत करा - गणेश शिंदे
---------------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रेरक व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नंदन जगदाळे जनरल सेक्रेटरी श्री. पी टी पाटील, सहसचिव श्री. अरुण देबडवार, खजिनदार तथा संस्कृतिक प्रमुख श्री. जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ सी एस मोरे, प्राचार्य डॉ एस एस गोरे, संस्थेचे सदस्य, विश्वस्त, शाखाप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून २ फेब्रुवारी २०२३ रोजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे "जीवन सुंदर आहे" या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी गणेश शिंदे म्हणाले, १९३४ साली मामांनी शेतकरी व गरीब विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग सुरू केले. पुढे शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. निस्वार्थी भावनेतून मामांनी समाजाची अविरत सेवा केली. आपल्या मुलांनी शिकावे व स्वतःच्या पायावर उभा राहावे यासाठी मामा नेहमी प्रयत्नशील होते. स्वतःच्या ज्ञानातून समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजेत यावर मामांचा भर होता. जीवनात अडचणी तर येणारच. परीक्षा तर द्यावी लागणारच. परंतु कोणत्याही अडचणी आणि परीक्षांना न डगमगता आनंदाने, आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामोरे गेल्यास यश निश्चितच मिळते. सद्यस्थितीत परीक्षार्थीवर भर दिला जात आहे. ज्ञान, मूल्य, चारित्र्य या गुणांची जोपासना करून आपले जीवन सार्थक करा. आई-वडिलांचे उपकार विसरू नका. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा भावी जीवनात उपयोग करा. शिक्षक हेच आपल्या जीवनाचे प्रेरक आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्याकडून ज्ञान, कौशल्य, क्षमता घ्याव्यात आणि आपले जीवन सार्थकी करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली राबविली जाते. विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. समाजातील गरजू व गरीब रुग्णांना अत्याधुनिक सेवा देण्याचे काम संस्थेच्या जगदाळे मामा हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि ज्ञानाच्या जोरावर एकविसाव्या शतकातील आव्हाने स्वीकारली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. पी टी पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. किरण गाढवे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय कारंडे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखातील शाखाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.