पंढरपूर महावितरण शहर कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना"ACB" "च्या जाळ्यात

पंढरपूर महावितरण शहर कार्यालयातील कर्मचारी  लाच घेताना"ACB" "च्या जाळ्यात

-----------------------------------------------------------------------------------
                 रंगेहात पकडले, एकच उडाली खळबळ
-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कोरोली येथील किराणा दुकानदाराकडे नवीन कनेक्शन देण्यासाठी तसेच दंडाचे रक्कम कमी करण्यासाठी म्हणून 15000 रुपये लाचेची मागणी केली असता 5000 रुपये लाच घेताना सहाय्यक लेखापाल वर्ग तीन महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण 2 या ठिकाणी कार्यरत असलेले संशयित आरोपी लोकसेवक श्रीकांत भिमराव आवाड रा. सोलापूर यास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली.

याबाबत समजलेले अधिक माहिती अशी यातील तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. नमूद दुकानांमध्ये नवीन वीज मीटर घेण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी शेजारच्या दुकानातून लाईट कनेक्शन घेतले म्हणून त्याच्यावर ७०,०००/रू चा दंड आकारलेला आहे असे सांगून तो दंड माफ करण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक श्रीकांत भिमराव आवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस पंधरा हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे कबूल करून, ती लाच रक्कम महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या कार्यालयाच्या आवारात स्वीकारले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पो.शि. रियाज शेख, पो.शि. दिनेश माने,पो. शि मंगेश कांबळे चालक  पो.हवा दिवेकर, ला.प्र.वि. पुणे. यांनी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अमोल तांबे, व अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी ,कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.