श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा.....
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- चैत्र शुध्द 1 हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षारंभाचा दिवस आहे. नवीन वर्षानिमित्त श्री विठ्ठल- रूक्मिणी मातेस नवीन महावस्त्रे परिधान करण्यात आली. मंदिरात सकाळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या शुभहस्ते ध्वज पुजन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, श्री संत नामदेव पायरीवरील (महाद्वारावरील) गोपूर, श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपुर, या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले. सकाळी पंचांग पूजन करण्यात आले. मंदिर समितीचे पुजारी वेद शास्त्र संपन्न समीर कौलगी यांनी पंचांग वाचन केले. या दिवसापासून श्रीं चे महानैवेद्यामध्ये श्रीखंड वापरण्यास सुरवात करण्यात येणार आहेत.

◼️ अन्नछत्रात वर्धापन दिनांनिमित्त विशेष भोजन प्रसाद
हिंदू धर्मात अन्नदानाचे महत्व अनन्य साधारण आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे.
मंदिर समितीचे श्री संत तुकाराम भवन येथे विनामूल्य अन्नछत्र सुरू असून, या अन्नछत्राचा सन 1996 पासून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला आहे. आज अन्नछत्राचा वर्धापन दिन असल्याने विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत मोफत पोटभर भोजनप्रसाद भाविकांना उपलब्ध करून देतो, त्याचा दैनंदिन 2500 ते 3000 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आज वर्धापन दिनांनिमित्त भाविकांना बटाटा भाजी, भात-वरण, श्रीखंड पुरी, भजी, पापड इत्यादी भोजन प्रसाद वाटप करण्यात आला. या अन्नछत्राची जबाबदारी विभाग प्रमुख विनोद पाटील यांना देण्यात आली असून, यां अन्नछत्रामध्ये अन्नदान करण्यासाठी विविध योजना असून इच्छुक भाविकांना कार्यालयात संपर्क करून अधिक माहिती जाणून घेता येईल.
◼️ श्री विठ्ठल- रूक्मिणी मातेस अलंकार

श्री विठ्ठल -रूक्मिणी मातेस दुपारच्या पोषाखावेळी अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री विठ्ठलास सोने पगडी, कौस्तुभ मणी, हि-याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठा, नाम निळाचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, लहान शिरपेच, नवरत्नाचा हार, तोडे जोड, तुळशीची माळ, मत्स्य जोड, पितांबर व ठुशी तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार, सरी व कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले. याशिवाय, श्री विठ्ठलास रेशमी सोहळे - अंगी व श्री रूक्मिणीमातेस नऊवारी रेशमी साडीचा पोषाख करण्यात आला आहे. त्यामुळे श्रींचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल- रूक्मिणी मातेचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
◼️ श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या चंदनउटी पूजेस प्रारंभ ,
ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होत आहे, या चंदनउटी पूजेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.
◼️ भाविकांची दर्शन रांगेत गर्दी,
हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मंदिर परिसरात व दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिर समितीमार्फत भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, गर्दी लक्षात घेता भाविकांचे जलद व सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणे, कामांडोज नियुक्ती आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याशिवाय, दर्शन रांगेत तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेटिंग, मॅट, पिण्याचे पाण्याची व्यवस्था व इतर अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या मंदिरामुळे विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत असून, श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक श्रीक्षेत्र पंढरपुरात दाखल झाले होते. पहाटेपासूनच नाम गजराने मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात दुमदुमून गेला होता.