श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा भक्तीमय वातावरणात संपन्न...

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा भक्तीमय वातावरणात संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर;( दै. पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे कार्तिकी यात्रा शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत कार्तिकी सोहळा भक्ती मय वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरी माजी सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या शुभहस्ते भक्तीमय वातावरणात करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली. कार्तिकी यात्रा सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी झाली होती. गर्दी विचारात घेऊन भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आली होती.

परंपरेनुसार चांगला मुहूर्त व चांगला दिवस पाहून दिनांक २८ /१०/२०२२ रोजी श्री चा पलंग काढून सर्व भाविक भक्तांना जास्तीत जास्त सुलभ दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. होती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा पलंग काढल्याने काकड आरती पोशाख ,धुपारती ,शेजाआरती इत्यादी. राजोपचार बंद करून नित्य पूजा महानैवद्य हे राजोपचार सुरू करण्यात आले होते. सदरचे राजोउपचार पूर्वत करण्यासाठी चांगला मुहूर्त व दिवस पाहून कार्तिक वद्य ५ रविवार दि.१३/११/२०२२ रोजी श्रीला विधिवत प्रक्षाळ पूजा आयोजित करण्यात आली होती. या प्रक्षाळ पूजेला श्री विठ्ठलाकडे ११ ब्रह्म व वृंदा कडून रुद्रांचा अभिषेक व श्री रुक्मिणी मातेला ११ ब्रह्मवृंदाकडून पवमान अभिषेक पूजा करण्यात आली .

यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव तसेच मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते श्री पहिले स्नान घालण्यात आले. व सायंकाळी शेजारतीनंतर देवाचा शीनवटा घालवण्यासाठी १७ वनस्पतीचा काढा नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला .यावेळी कार्यक्रमास मंदिर समिती सदस्य कर्मचारी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.