पंढरपुरात ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण; ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सचे टायर फोडले
____________________________________________________
पंढरपूर प्रतिनिधी : ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला रात्री पंढरपूर तालुक्यात हिंसक वळण लागले.
श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे ४० टायर अज्ञात लोकांनी फोडले आहेत. यामध्ये ट्रॅक्टर मालकाचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलनची हाक देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ऊसतोडी बंद करून ऊस वाहतूक करू नये असे आवाहन ऊसदर संघर्ष समितीकडून केले गेले होते. मात्र त्यानंतरही ऊस वाहतूक सुरू होती. दरम्यान काल बुधवारी रात्री अज्ञातांनी रात्री ऊस वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. या प्रकारामुळे ऊसदर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.