श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची ऑनलाईन नोंदणी १३ मार्चपासून सुरू,– कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. ◼️ चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र प्रारंभापर्यंत पूजेचा कालावधी

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची ऑनलाईन नोंदणी १३ मार्चपासून सुरू,– कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.  ◼️ चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र प्रारंभापर्यंत पूजेचा कालावधी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होईपर्यंत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची पारंपरिक चंदनउटी पूजा आयोजित करण्यात येत आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या मूर्तींना शीतलता लाभावी या परंपरेनुसार सदर पूजा संपन्न केली जाते.

सन २०२६ सालाकरिता चंदनउटी पूजेचा कालावधी दि.१९ मार्च ते दि.०८ जून २०२६ (अंदाजे) असा निश्चित करण्यात आला असून, सदर पूजा श्रींच्या पोषाखानंतर दुपारी ४.३० ते ५.१५ या वेळेत करण्यात येणार आहे. या पूजेसाठी भाविकांना घरबसल्या नोंदणी करता यावी यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि.१३ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

मंदिर समितीची दि.०३ मार्च, २०२४ रोजी सह-अध्यक्ष मा. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व पूजांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आवश्यक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे पूजेची नोंदणी करता येणार आहे. भाविकांनी https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे रु.२१,०००/- व रु.९,०००/- इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करताना अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत मार्गदर्शन व नोंदणीस सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर पूजेबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी भाविकांनी दूरध्वनी क्र. ०२१८६-२९९२९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.