बार्शीत "मी जिजाऊ बोलतेय" एकपात्रीतून जिजाऊ साकारल्या
-----------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज )श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ, सावित्री, रमाई महिला बळ विकास समिती व कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिकच्या सुप्रसिद्ध साहित्यिक, निवेदिका, एकपात्री कलाकार डॉ. प्रतिभा जाधव यांच्या " मी जिजाऊ बोलतेय" या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट सौ. मिनलताई साठे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मीनाक्षीताई पाटील या उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष श्री एन एन जगदाळे, जनरल सेक्रेटरी श्री पी टी पाटील, सह सचिव श्री ए पी देबडवार, खजिनदार श्री जे सी शितोळे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व विश्वस्त, प्राचार्य, शाखाप्रमुख , समितीचे सर्व पदाधिकारी, महिला शिक्षक, पालक व विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रतिभा जाधव यांनी "मी जिजाऊ बोलतेय" या एकपात्री प्रयोगाचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या शूर व पराक्रमी कारकिर्दीचा आढावा घेतला. ऐतिहासिक घटनांची सुंदर मांडणी केली. अनेक प्रसंगाचे लिलया सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली. त्या म्हणाल्या," शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. महिला व मुलींनी आपले क्षेत्र ओळखून प्रगती करा. उच्च शिक्षण पूर्ण करा. अंधश्रद्धा नष्ट करा. वाईट विचारांचा उपवास करा.महिलांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे गरजेचे आहे. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्या. मुलगा- मुलगी यांच्यात भेद करू नका. मुली व महिलांवरील अत्याचार सहन करू नका असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी किसान कामगार विद्यालय उपळाईच्या शिक्षिका संगिता गाढवे व सहकाऱ्यांनी "रंगूनी रंगात साऱ्या" या लघु नाटिकेचे सादरीकरण केले. उदघाटक प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट सौ. मिनलताई साठे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मीनाक्षीताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक स्मिता सुरवसे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा. ज्योती यादव व प्रा. विजयश्री गवळी यांनी करून दिला. प्रा. मंजुषा श्रीमंगल यांनी समितीचा अहवाल सादर केला. उपस्थितांचे आभार डॉ एल आय राठोड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आसावरी फरताडे यांनी केले.