परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी व कॉपी मुक्त परीक्षेसाठी काटेकोर अंमलबजावणी करणार -: तहसिलदार सचिन लंगुटे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी 9 भरारी पथके सज्ज
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (पंढरी नगरी न्यूज ):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत पंढरपूर तालुक्यात दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत एकुण 17 केंद्रांवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षा होत आहे. सदर परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी व कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी 9 पथके स्थापन केली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांना भेटी देण्याकरीता जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या आदेशान्वये उपविभागासाठी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांची भरारी पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंढरपूर तालुक्यासाठी तहसिलदार सचिन लंगुटे यांना भरारी पथक प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांना भेटी देण्याकरीता निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांची भरारी पथक प्रमुख नियुक्त केले आहे.
या प्रत्येक पथकामध्ये एक मंडळ अधिकारी, एक महिला तलाठी, व दोन पुरुष तलाठी यांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील दोन परीक्षा केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. सदर केंद्रांवर भेट देण्यासाठी भरारी पथक प्रमुख, निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, यांनी अव्वल कारकून श्रीमती मनिषा अंकुशे (महिला सदस्य), तलाठी समीर पटेल, अमर पाटील यांची नियुक्ती केली आहे.
तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी पंढरपूर यांनी इयत्ता 12 वी चे परीक्षेसाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व 17 केंद्रांवर, प्रत्येक केंद्रावर 5 कर्मचा-यांचे (महसूल, पोलीस पाटील व पंचायत समिती कार्यालयाकडील कर्मचारी) यांची संयुक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तर दि. 01 मार्च पासून होणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांना भेटी देण्याकरीता सुध्दा अशाच पध्दतीने पथके नियुक्त केली आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखालील या परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे तहसिलदार लंगुटे यांनी सांगितले.