ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन गरजेचे - खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर

ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन गरजेचे - खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर

_____________________________________________________

बार्शी; (प्रतिनिधी):- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी व बी-फिट फिटनेस क्लब आणि नवले ग्लास हाऊस, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने  वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त भव्य जलतरण स्पर्धा कर्मवीर जलतरण तलाव बार्शी येथे रविवार ९ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेसाठी वय वर्षे ६, ८, १०, १२, १४, १७, १९ व खुल्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून धाराशिवचे खासदार मा. श्री. ओमप्रकाश राजे निंबाळकर, माजी मंत्री  मा. श्री. दिलीपरावजी सोपल, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष मा. डॉ. बी. वाय. यादव तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. कृष्णराज बारबोले,  संस्थेचे जनरल सेक्रेटरी  मा. श्री. पी. टी. पाटील, विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ एस एस गोरे, कर्मवीर जलतरण तलावाचे व्यवस्थापक श्री. सुंदररावजी लोमटे, बी-फिट फिटनेस क्लब व  नवले ग्लास हाऊस बार्शीचे श्री. प्रमोद नवले व श्री. प्रदीप नवले हे उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी केले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा विकासाचा आढावा त्यांनी मांडला. तसेच जलतरण तलावाच्या निर्मितीतील बाबांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री श्री. दिलीपरावजी सोपल साहेब यांनी आपल्या मनोगतात मामासाहेबांनी बार्शी पंचक्रोशीत समाजाला ज्ञानमंदिर खुले केल्याचे नमूद केले. तसेच मामांचे खेळाकडे असलेले विशेष लक्ष खास करून आट्यापाट्या, कुस्ती,कबड्डी, पोहणे या खेळासाठी ते आग्रही असल्याचे नमूद केले. तसेच ग्रामीण भागामध्ये जागतिक दर्जाचा जलतरण तलाव बार्शीकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबाबत संस्थेचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात संस्था करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत अभिमान वाटत असल्याचे नमूद केले. संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. तसेच या स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल नवले ग्लास हाऊसचे प्रमोद नवले व प्रदीप नवले यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या ट्रॉमा सेंटरला भरीव आर्थिक मदत देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.अध्यक्षीय समारोपमध्ये संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव साहेब यांनी  कर्मवीर जलतरण तलावाची निर्मिती ग्रामीण भागातील क्रीडापटूंना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केल्याचे तसेच ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा जलतरण तलाव चालवत असल्याचे सांगितले.

या स्पर्धेत एकूण ९६ स्पर्धक सहभागी झाले. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर तसेच सोलापूर येथून स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण ७२ पुरुष स्पर्धक तसेच २४ महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी मंत्री श्री. दिलीपरावजी सोपल तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे, एम पी एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एम. लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेचे संयोजन श्री बाळासाहेब पिंगळे यांनी केले. या स्पर्धेमध्ये फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच ५० मीटर, १०० मीटर,२०० मीटर,४०० मीटर, ८०० मीटर व १५०० मीटर या अंतराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच पारितोषिक विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी बी पी एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. जी. कांबळे,  एम पी एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एम. लांडगे तसेच प्रा. पी. पी. नरळे, डॉ. एस. एस. मारकड, डॉ. एच‌. के. बारसकर, आर. एस. डिसले यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. सुरवसे व  प्रा. पी पी नरळे यांनी केले. संपूर्ण स्पर्धेचे पंचकार्य बी पी एड भाग दोनचे प्रशिक्षणार्थी यांनी केले.