२०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील .

२०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल  होतील .

------------------------------------------------------------------------------------
संस्थेचे जनरल सेक्रेटरी. पी. टी. पाटील यांचे मत,
------------------------------------------------------------------------------------

बार्शी( दै. पंढरी नगरी न्युज ) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, माजी  विद्यार्थी कल्याणकारी संस्था  व रोटरी क्लब, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि शिक्षकांची भूमिका" या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. पी टी पाटील यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे होते. यावेळी माजी प्राचार्य ,डॉ .सी एस मोरे, तज्ञ साधन व्यक्ति म्हणून डॉ ,एच एन जगताप, डॉ. दत्तात्रय तापकीर, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, रोटरी क्लब ऑफ बार्शीचे अध्यक्ष विजयश्री पाटील, समन्वयक डॉ. एस डी भिलेगावकर, आयक्यूएसी  समन्वयक डॉ. व्ही पी शिखरे इ .उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मा. श्री पी .टी .पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे यापूर्वीच्या आयोग व धोरणाचा आढावा घेऊन तयार करण्यात आले आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरावर आमुलाग्र बदल केले जाणार आहेत. बदलत्या परिस्थितीत शिक्षकांनी आपली बदलती भूमिका लक्षात घेऊन नव्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे.  उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्जनशील बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा मुख्य उद्देश आहे. यात व्यावसायिक कौशल्य विकास यावर भर दिला आहे. या संदर्भात आमच्या शैक्षणिक संस्थेने विविध परिसंवाद व परिषदांचे आयोजन केले आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार आमची शैक्षणिक संस्था शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी भक्कम पाठीशी राहील असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

डॉ. एच एन जगताप यांनी "प्राथमिक शिक्षण स्तरावर शिक्षकांची भूमिका" या विषयावर मार्गदर्शन केले. आजन्म शिक्षणाला पुष्टी देणारे हे धोरण आहे. शिक्षक हे सर्वाधिक आदरास पात्र आहेत. मूल्य शिक्षणाची समाजाला व विद्यार्थ्यांना गरज आहे. शिक्षकांना आपला आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध पद्धती, तंत्र व क्लृप्त्या  यांचा आधुनिक पद्धतीने वापर करावा लागेल. समाज माध्यमाद्वारे  ज्ञान पोहोचविणे गरजेचे होईल. विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती राबवावी लागेल. शिस्तप्रिय आज्ञाधारक विद्यार्थी ही संकल्पना काळानुरूप बदलली आहे. उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात प्रवेश करतील अशी अपेक्षा ठेवून त्यासंबंधीचे प्रयत्न केले जातील. शिक्षक पात्रता चाचण्या सशक्त केल्या जातील. मुलाखती स्थानिक भाषेतून घेतल्या जातील. शाळांमध्ये चांगली व सुखकर स्थिती निर्माण केली जाईल. शाळाबाह्य कामे शिक्षकांना दिली जाणार नाहीत. शिक्षकांचे सातत्याने मूल्यमापन देखील केले जाईल असे त्यांनी सांगितले.

डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी "उच्च शिक्षणातील शिक्षकांची भूमिका" याविषयी मार्गदर्शन केले. शैक्षणिक धोरणामुळे विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे जायचे आहे. संमिश्र अध्ययनाचा वापर करावा लागेल. शिक्षक व विद्यार्थी बहुभाषिक व बहुआयामी होणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणात संशोधन महत्त्वाचे असणार आहे. शिक्षकांना अध्यापन, अध्ययन, संशोधन, प्रशासन व विस्तार कार्य यात गुंतून घ्यावे लागेल. भविष्यातील तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीतील तंत्रज्ञान कालबाह्य होऊन अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभिरुचीनुसार ज्ञानप्राप्तीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम विकसित करावे लागतील. भविष्यात वर्ग ही शिक्षणाची जागा असणार नाही तर विद्यार्थी कुठेही असला तरी शिकू शकेल. अधिक प्रभावी तंत्रज्ञान निर्माण होईल. शिक्षकांनी आपला अनुभव आणि चिंतनाद्वारे माहितीचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी सातत्याने करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी  "माध्यमिक स्तरावर शिक्षकांची भूमिका" याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांनी मिळून कसे शिकावे, शिक्षक नुसते विद्यार्थी घडवत नाहीत असे नाही त्याचे चारित्त्र्यही घडवतो. चारित्र्यवान समाज घडवतो. सकारात्मक बाजूने विचार करून ज्ञानरचनावादी अध्यापनसाठी माध्यमिक शिक्षकांना भूमिका करायची आहे. विशिष्ट विचार ठेवून शिक्षकांनी भूमिका करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यास कृती करायची आहे. शिक्षकांच्या भूमिका करताना अनेक अडचणी आहेत. यासाठी शिक्षक स्वाभिमानी, धाडसी, आत्मविश्वासू व विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा असावा असे त्यांनी सुचवले.

माजी प्राचार्य डॉ .सी एस मोरे यांनी २०२० च्या  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात विवेचन केले. २१ व्या शतकात विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. बहुशाखीय शिक्षणप्रणाली उदयास येत आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास, मूल्ये, कौशल्ये, तंत्रज्ञान , समाजमाध्यमे आदि संदर्भात माहिती घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकाला मानाचे व सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे.  प्राचीन भारतीय गुरु -शिष्य परंपरा जोपासलेली दिसून येते. शिक्षकाची समाजातील प्रतिष्ठा खालावत चाललेली आहे. ही प्रतिष्ठा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षकापुढे आव्हाने असतील, समस्या नाही. शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे हे धोरण सर्व शिक्षकापर्यंत पोहोचले पाहिजे. सर्वांना सहज शिक्षण, समान शिक्षण, सर्वांना परवडणारे शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षणाचे उत्तरदायित्व आदी घटकावर आधारित असे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. विद्यार्थ्याचा मूलभूत विकास, अंतरवैयक्तिक संबंध, व्यक्तिमत्व विकास, शिस्त,मूल्ये, संस्कार आदी घटकावर आधारित बहुआयामी राष्ट्रीय धोरण आहे असे त्यांनी सांगितले.

हा परिषदेच्या  कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एस गोरे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, रोटरीचे पदाधिकारी व सदस्य आदींनी योगदान दिले.