वंदे भारत रेल्वे मधील सफर साठी नवोदय विद्यालयातील २० प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड
_______________________________________________
तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : भारत सरकार नवी दिल्ली, अंतर्गत रेल्वे मंत्रालय द्वारा आज शुक्रवार दिनांक १०.२. २३ रोजी मुंबई ते सोलापूर या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे मुंबई येथून होणार आहे .या वंदे भारत रेल्वे मध्ये उद्घाटन प्रसंगी प्रवास करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय ,तुळजापूर येथील २० प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. हे विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गात अध्ययन करीत आहेत .या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे पालकही सफर करणार आहेत. यासाठी आज सकाळी ८ वाजता विद्यार्थी, पालक, मार्ग संरक्षक शिक्षक यांचे प्रस्थान झाले आहे . हे विद्यार्थी पुणे (सायंकाळी सात वाजता) येथून सोलापूर पर्यंत वंदे भारत या रेल्वेने उद्घाटन प्रसंगी मोफत प्रवास करणार आहेत .
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. मार्ग संरक्षक म्हणून सुजाता कराड, आर के शुक्ला, सी .एस. गोमारे यांची निवड झालेली आहे. या निवडीबद्दल उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबासे, विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह , पालक समितीचे सदस्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, नवोदय विद्यालय परिवार यांच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून या अभिनव प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.