केंद्रात असंवेदनशील सरकार:- खा. सुप्रिया सुळे.
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (प्रतिनिधी):- देशापुढे सध्या औद्योगिक, आर्थिक, कृषी, व्यापार, आरोग्य, शिक्षण या सर्व बाबतीत मोठ्या अडचणी आहेत याला सध्याचे असंवेदनशील केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर येथे केली आहे.
खा. सुप्रिया सुळे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता पंढरपूर येथे श्री. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्याकरिता आल्या होत्या, दर्शन घेतल्यानंतर त्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयमाला गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार श्री. दीपक साळुंखे व त्यांच्या भगिनी सौ. जयमाला गायकवाड यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्या राष्ट्रवादी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. संदीप मांडवे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी थांबल्या. मांडवे यांच्या निवासस्थानी आमच्या पंढरी न्यूज चॅनलशी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत 'विठ्ठल' कारखान्याचे चेअरमन श्री. अभिजीत पाटील पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष श्री. सुभाष भोसले हे उपस्थित होते
खा. सुप्रिया सुळे यांच्याशी आम्ही खास संवाद साधला त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची दिशा योग्य नसल्याचे सांगत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरा त्यांच्याशी विसंगत असे राजकारण होत असल्याची खंत व्यक्त केली. एकूणच देशांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रात होत असलेली पीछेहाट यापूर्वी कधीही झालेली नव्हती. देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये खूप मोठी संकटे निर्माण झाली आहेत, त्यावर उपाययोजना केली जात नसल्याचे सांगून केंद्रातील भाजप सरकारवरच जबाबदार आहे, हे भाजप सरकार असंवेदनशील असल्याचे सांगून आक्रमक भाषेत टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार श्री. शरद पवार यांच्या दौऱ्याबद्दल नुकतेच सुप्रिया सुळे यांनी विधान केले होते, याबाबत त्यांना विचारले असता, शरद पवार ज्या ज्यावेळी महाराष्ट्राभर दौरा करतात त्या त्यावेळी सत्ता मिळते असे समीकरण झाले आहे, हे सांगताना शरद पवार यांच्या आयुष्यातील २७ वर्षे सत्तेत गेली तर २७ वर्षे विरोधी पक्षात गेली, परंतु महाराष्ट्रातील जनतेने पवार कुटुंबीयांना भरभरून प्रेम दिले आहे. विशेषतः विरोधात असताना अधिक जास्त प्रेम दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.