करकंब येथील विठ्ठलरावजी शिंदे कारखान्यावर आंदोलक आणि पोलिसांची झटापट!

करकंब येथील  विठ्ठलरावजी शिंदे कारखान्यावर आंदोलक आणि पोलिसांची झटापट!

________________________________________________

पंढरपूर; पंढरी- नगरी न्यूज : शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिला हप्ता  २ हजार ५०० तर अंतिम दर ३ हजार १०० रुपये या मागणीसाठी ऊस संघर्ष समितीने आज पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विठ्ठलरावजी शिंदे युनिट क्रमांक दोन  येथे आंदोलन केले. यावेळी या आंदोलनादरम्यान  आंदोलक आणि पोलिसांची मोठी झटापट झाली. त्यामुळे कारखाना परिसरामध्ये तणावाचे वातावरण बनले होते.

ऊस दराच्या संदर्भात पंढरपूर येथे झालेल्या ऊस परिषदेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे कारखानदारांनी गळीत हंगामास प्रारंभ केला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन वज्रमुठ आवळत उसाच्या दरासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज करकंब येथील विठ्ठलरावजी शिंदे शुगर येथे आंदोलकांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी कार्यकारी संचालक यादव यांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला. आंदोलक आणि  कारखाना प्रशासन यांच्यात बोलणे सुरू असताना अचानकपणे कार्यकारी संचालकांनी योग्य उत्तर न  दिल्याने आंदोलकांमध्ये उद्रेक झाला. आणि या सर्वांनी गव्हाणीत उड्या टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

यावेळी दीपक भोसले, अतुल खूपसे, माऊली हळणवर, विश्रांती भुसणर, समाधान फाटे, तानाजी बागल, सचिन शिंदे, माऊली जवळेकर, नामदेव कोरके, शहाजान शेख,  शशिकांत थोरात, राजकुमार सरडे, विठ्ठल मस्के, अमर पवार, नामदेव पवार, बाळासाहेब जगदाळे, बापू मोहिते, नवनाथ मोहिते, राहुल शिंदे, विठ्ठल कानगुडे, अमर इंगळे, पराप्पा ढावरे, नितीन गावडे, प्रताप चंदनकर, शिवाजी पाटील, राहुल बिडवे, गणेश ढोबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. बबनदादा शिंदे यांचा ऊस संघर्ष समितीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न ऊस संघर्ष समितीने आज करकंब येथील विठ्ठलरावजी शिंदे शुगर येथे आंदोलन केले. त्यावेळी कारखान्याचे संस्थापक आ. बबनदादा शिंदे यांनी आंदोलकांशी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र या बैठकीला जनशक्तीचे संस्थापक अतुल खूपसे-पाटील चालणार नाहीत, त्यांना घेऊन येऊ नका  असे सांगून ऊस संघर्ष समितीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तर ऊस संघर्ष समितीने अतुल खूपसे पाटील असतील तरच आम्ही बैठकीला येणार अन्यथा बैठक होणार नाही अशा शब्दात सुनावले. त्यामुळे आज होणारी बैठक रद्द करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व कारखानदार आणि ऊस संघर्ष समितीची उद्या ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आहे. या बैठकीला सर्व कारखान्यांचे चेअरमन व कार्यकारी संचालकांनी उपस्थित राहावे अशी अट ऊस संघर्ष समितीने घातली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास जिल्ह्यातील जास्त ऊस कारखाने असणारे आणि सर्वाधिक गाळप करणारे शिंदे कुटुंबीयांच्या दारात ऊस संघर्ष समिती आंदोलन करणार असल्याचे समितीने सांगितले.