पंढरपूर अर्बन बँक कर्मचारी आता अर्थरक्षकबरोबरच जीवनरक्षक म्हणून कार्यरत ◼️ रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचा विशेष उपक्रम
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज )अर्थ कारणाबरोबर समाजकारणात अग्रेसर असणारी पंढरपूर अर्बन बँक कर्मचारी वर्गाला रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे वतीने आज बँकेचे कर्मयोगी सभागृह येथे आरोग्य जनजागृती उपक्रमांतर्गत CPR (Cardiopulmonary Resuscitation) या जीवनरक्षक तंत्रावरील देणेत आलेले मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी डॉ.नीरज दोडके व डॉ. वैभव सादिगले, तसेच बँकेचे संचालिका डॉ.संगीता पाटील यांनी हार्ट अटॅकसारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला त्वरित मदत कशी करावी याबाबत सखोल माहिती दिली.
यावेळी बँकेचे संचालक हरिश ताठे, अमित मांगले, गणेश शिंगण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, व्यवस्थापक गणेश हरिदास व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचे कुटुंबप्रमुख प्रशांत परिचारक व चेअरमन सतीश मुळे यांनी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशंसा केली.
कार्यक्रमादरम्यान कृत्रिम श्वास (rescue breathing) कसा द्यावा, तसेच हृदयावर किती प्रमाणात व कशा पद्धतीने दाब (chest compressions) द्यावा याचे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघात किंवा अचानक बेशुद्ध पडलेल्या रुग्णामध्ये CPR आवश्यक आहे की नाही हे कसे ओळखावे, याबाबतही विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
डॉ.दोडके यांनी ppt द्वारे एखाद्या व्याख्यात्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे CPR करण्याची योग्य पद्धत दाखवून उपस्थितांना प्रशिक्षण दिले, ज्यामुळे बँक कर्मचारी यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली.
याचबरोबर संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि दैनंदिन चालण्याचे महत्त्व यावरही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानिमित्त बँकेच्या माननीय संचालकांनी डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ.दोडके यांनी दिलेली सविस्तर उत्तरे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली.
बँकेचे कर्मचारी भविष्यात अर्थरक्षक बरोबर जीवनरक्षक म्हणून कार्य करून अशी अपेक्षा रोटरी क्लब यांचे वतीने व्यक्त करणेत आली.
या कार्यक्रमास बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.