माणूसकी ही जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे: - यजुर्वेंद्र महाजन
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज ) सध्याच्या काळात माणूस अधिक स्वार्थी बनत चाललेला असून, खरंतर आपली संस्कृती दुसऱ्यांना मदतीचा हात देऊन पुढे घेऊन जाणारी आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे याच संस्कृतीतून आकाराला आलेले आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या त्याग, निस्पृह जीवनामुळेच आजची आपली पिढी आनंदाचे जगणे अनुभवत आहे. मामासाहेबांना माहीत होते की माणूसकी हीच जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे असे प्रतिपादन जळगाव येथील मनोबल दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंती निमित्त आयोजित प्रेरक व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार तथा सांस्कृतिक विभागाचे चेअरमन जयकुमार शितोळे, सहसचिव अरुण देबडवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे महाजन म्हणाले, काही व्यक्ती असे जीवन जगतात की ते शरीररुपाने या जगातून जातात पण त्यांचे नाव, काम आणि विचार प्रेरणा देत राहतात. मी माझे राहते घर विकून गरजू दोनशे मुलांची घरे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. तो केवढा फायद्याचा सौदा होता याची प्रचिती मला दिसत आहे. तसेच माझ्या जीवनात परिवर्तन करणारी घटना म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान होते. स्वामी विवेकानंद यांच्या मते सर्व समस्याचे मूळ हे भिती आहे. मी हिंदू तेजा जागरे हे पुस्तक वाचल्याने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. आपल्या आयुष्यात पुस्तक, व्याख्याने आणि चांगल्या लोकांची संगत मिळाली तर आयुष्याचे सोने होण्यास विलंब लागत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तक्रार करत बसू नये. विद्यार्थी हे आपली मुले आहेत असे समजून शिकविले पाहिजे. मास्तर म्हणजे मातेच्या स्तरावर जाऊन शिकवणे गरजेचे बनले असेही त्यांनी सांगीतले.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना खजिनदार जयकुमार शितोळे यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. विष्णू शिखरे यांनी केले, तर आभार सचिव प्रकाश पाटील यांनी मानले.