राज्यातील सहकारी साखर कारखान्या पुढे पांडुरंग ने आदर्श निर्माण केले - पालकमंत्री ना .राधाकृष्ण विखे - पाटील..
_____________________________________________________
श्रीपुर( प्रतिनिधी ) : सहकारी साखर कारखानदारी टिकून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देता यावा यासाठी सुधाकर पंत परिचारक यांनी आयुष्यभर ध्यास घेऊन काम केले त्यामुळेच पांडुरंग सहकारी साखर कारखाना राज्यात नावलौकिक ठरला आहे राज्यातील सहकारी साखर कारखान्या पुढे पांडुरंगने आदर्श निर्माण केला असल्याचे मत राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.*
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ तसेच आसवणी प्रकल्प विस्तारीकरण उद्घाटन पालकमंत्री विखे-पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, चेअरमन प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक उमेश परिचारक, दिनकराव मोरे, वसंतराव देशमुख, हरीष गायकवाड, सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विखे-पाटील म्हणाले, युपीएच्या काळात सहकारी कारखाने आजारी पडले की, कांही लोक विकत घ्यायला जायचे राज्यात सहकारी साखर कारखाने विकत घेणारी एक टोळी तयार झाली होती. ५० कोटीचे कारखाने २० ते २२ कोटीला विकले गेले आणि सहकाराचा आत्मा संपविण्याचे कामा केले, बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना राज्य सरकारने मदत करून आधार देणे गरजेचे असताना तसे झाले नाही. त्यावेळी निश्चित धोरण नव्हते, कुठे कशाचा मेळ नव्हता, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा थेट नामोल्लेख टाळून 'जाणते राजे' असा त्यांनी अनेक वेळा उपहासाने उल्लेख केला.
यावेळी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, पूर्वी आसवनी प्रकल्पाला मिळणारे पाणी प्रती हजार लिटर पाण्याला २२ रुपये आकारणी केली जात होती, आता हजार लिटरला ३३० रुपये आकारणी लागू केली आहे. एवढी मोठी आकारणी कारखान्याला न परवडणारी आहे, त्यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी साखर उद्योगातील अडचणीकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले कारखाना नेहमीच वेग-वेगळे प्रयोग राबवित असून कारखान्याने मागील वर्षी ड्राय स्पेंटवॉश पासून ड्राय पोटॅश बनवून ते पोटॅश म्हणून शेतकर्यांना देण्याचे नियोजन हाती घेतले असून त्याची ट्रायल यशस्वी झाली आहे, यावर्षी पूर्ण क्षमतेने पोटॅशचा व्यवसाय जो कारखान्याला फायदेशीर आहे, तो करण्याचे नियोजन आहे. तसेच कारखाना घेतला त्यावेळेस ३५ एकर जागेवर हा कारखाना होता त्यामुळे कारखान्याचे विस्तारीकरण करताना जागेची अडचण येत आहे. त्यासाठी शेती महामंडळाकडील जमीन कारखान्याला देण्याबाबत निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांना केले.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. मनोज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर व्हा.चेअरमन कैलास खुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.